---Advertisement---

“मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे …”; राज ठाकरेंनी ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर ‘सुख पाहता’ या नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ डिझाईन केल्याची ३५ वर्षांपूर्वीची आठवण शेअर केली आहे.

On: February 24, 2026 6:47 PM
---Advertisement---

राजकारणातले राज ठाकरे आणि त्यांच्या कुंचल्यातून साकारणारी भेदक व्यंगचित्रं महाराष्ट्राला नवी नाहीत. पण या धडाडत्या तोफेलाही एका जुन्या पुस्तकाने चक्क ३५ वर्षं मागे नेलंय, हे तुम्हाला माहितीये का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली असून राजकीय वर्तुळासोबतच सांस्कृतिक विश्वातही चांगलीच चर्चा रंगली आहे.

स्वतःच्या लायब्ररीत पुस्तक शोधताना राज यांच्या हाती ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांच्या ‘सुख पाहता’ या नाटकाचं जुनं पुस्तक लागलं आणि एका भन्नाट किस्स्याला उजाळा मिळाला. महाराष्ट्राच्या राजकारणात कलेची आणि साहित्याची इतकी जाण असणारे फार मोजके नेते आहेत, याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आलाय.

१९८९ सालची ती गोष्ट. राज यांचे सासरे आणि ज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघ त्यांच्या घरी आले होते. कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ या नाटकाची निर्मिती वाघ करत होते. विशेष म्हणजे, या नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ खुद्द राज ठाकरेंनी डिझाईन करावं, अशी स्वतः कानेटकरांची आणि वाघांची इच्छा होती.

तेव्हा सामना, मार्मिक आणि लोकसत्तामध्ये राजकीय व्यंगचित्रं काढणाऱ्या राज यांच्यासाठी हा अनुभव एकदम नवा होता. “मी आधी नाटक बघतो, मग सांगतो,” असं त्यांनी वाघ यांना स्पष्ट सांगितलं. शिवाजी मंदिरला हे नाटक पाहिल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते यशवंत दत्त यांनी मंचावर साकारलेल्या ६ वेगवेगळ्या भूमिका पाहून राज अक्षरशः थक्क झाले.

घरी परतल्यावर अवघ्या एका दिवसात राज यांनी या पुस्तकाचं मुखपृष्ठ तयार केलं. ते डिझाईन कानेटकर आणि वाघ या दोन्ही दिग्गजांना प्रचंड भावलं. हा प्रसंग शेअर करताना राज जुन्या आठवणीत रमलेले दिसले.

“मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाटकाचं पुस्तक हातात घेऊन ते झपाटल्यासारखं वाचण्याचा तो सुवर्णकाळ पुन्हा येऊ दे,” अशी सदिच्छा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे. राज यांची ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment