राज्यातील बळीराजासाठी एक खूशखबर आहे, पण त्यासोबतच एक ‘ट्विस्ट’ सुद्धा आहे. शेतकरी कर्जमाफीचा (Farmers Loan Waiver) मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, महायुती सरकार खरोखरच शेतकऱ्यांना दिलासा देणार का, या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. मात्र, ही कर्जमाफी सरसकट नसून, त्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निकष लावला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे एका सभेत बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केलं की, सरकार गरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. वर्षानुवर्षे शेतात राबणाऱ्या, कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल. मात्र, यात एक मोठी मेख आहे. बावनकुळे यांनी निक्षून सांगितलं की, “फार्महाऊसधारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.” फक्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच याचा फायदा मिळेल, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बावनकुळे म्हणाले की, “गरीब शेतकरी ४०-४० वर्षे शेतात राबतो. कर्जावर व्याज आणि त्या व्याजावर व्याज वाढत जातं, ज्यामुळे तो हतबल होऊन आत्महत्येचा विचार करतो. पण आम्ही आमच्या शेतकऱ्यांना असं मरु देणार नाही.” बावनकुळेंच्या या विधानामुळे कर्जमाफीच्या आशा पल्लवित झाल्या असल्या, तरी ‘गरीब शेतकरी’ नक्की कोणाला म्हणायचं आणि याचे निकष काय असतील, याबाबत अजूनही संभ्रम आहे.
दुसरीकडे, ‘लाडकी बहीण योजने’ वरून (Ladki Bahin Yojana) त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसशासित राज्यांमध्ये ही योजना बंद पडली असल्याचा दावा करत, महाराष्ट्रात मात्र देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ही योजना अविरत सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सोबतच महिलांना आता विनातारण ५ लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी यावेळी केली.








